मराठा समाजात असंतोषाची लाट,आचारसंहितेनंतर जरांगे पाटील यांची आव्हानात्मक भूमिका

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज आरक्षणासाठी गेल्या १४ महिन्यांपासून आंदोलन करत आहे, परंतु सरकारकडून त्याला अद्याप सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. जरांगे पाटील यांनी दसऱ्याला सरकारला इशारा दिला होता की आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आरक्षण दिलं नाही तर सरकार उलथून टाकू, आणि आता त्यांनी ती भूमिका पुन्हा स्पष्ट केली आहे.

मराठा समाजाने १०० टक्के मतदान करावं 

जरांगे पाटील म्हणाले, "फडणवीसांनी मराठ्यांना बाजूला ठेवून सत्ता गाजवायचा प्रयत्न केला. त्यांनी आमच्या समाजाला अपमानित करून आम्हाला दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. मराठ्यांची पोरं मोठी होऊ नयेत यासाठी त्यांनी सत्तेचा गैरवापर केला."निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले की, या विधानसभेत मराठा समाज आपली ताकद दाखवून फडणवीसांना धडा शिकवेल. मराठा समाजाच्या मतांशिवाय सत्तेत येणं अशक्य आहे, असा विश्वास जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आणि मराठा समाजाने १०० टक्के मतदान करून आपल्या मतांचा प्रभाव दाखवावा, असं आवाहन केलं.

मराठा समाजाला मतदानाची ताकद दाखवण्याचं आवाहन

जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला मतदानाची ताकद दाखवण्याचं आवाहन केलं आहे. जरांगे पाटील यांनी सरकारवर आणि विशेषतः फडणवीसांवर गंभीर आरोप करताना सांगितले की, फडणवीस यांनी मराठ्यांना भिकारी बनवण्याचा कट रचला आहे. या राजकीय खेळात त्यांनी इतर जातींना ओबीसी प्रवर्गात स्थान दिलं, मात्र मराठ्यांना आरक्षण दिलं नाही. आता मराठा समाजाला एकजूट दाखवण्याची वेळ आली आहे. प्रत्येक मराठ्याचं मतदान व्हायलाच हवं."

जरांगे पाटील यांचे भाषण निवडणुकीच्या घोषणेनंतर येणाऱ्या राजकीय धुमश्चक्रीला अधिक वेग देणारे आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, मराठा समाजाच्या मदतीशिवाय कुणालाही सत्ता मिळवणे अशक्य आहे. यावेळी त्यांनी इतर समाजांचा मुद्दा देखील मांडला, ज्यात दलित, मुस्लिम, शेतकरी, धनगर यांचा समावेश आहे, आणि त्यांनी सर्वांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्याचे आवाहन केले.

निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली असून, २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. जरांगे पाटील यांनी या निवडणुकीत मराठा समाजाने फडणवीस आणि त्यांच्या सरकारला धडा शिकवण्याचं आवाहन केलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने