Spain: आठ तासांत पडला वर्षभराचा पाऊस,स्पेनमध्ये भीषण पुराचा कहर

स्पेनमध्ये मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे देशाच्या पूर्व भागातील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. या पुराच्या तडाख्यामुळे ९५ हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर अनेकजण अद्याप बेपत्ता आहेत. हजारो नागरिकांचे घरं पाण्याखाली गेली असून, रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी या आपत्तीनंतर तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.


 पूरग्रस्त भागात मदतीचा ओघ

व्हॅलेन्सिया, अलीकांते, मर्सिया या प्रदेशात पुराची तीव्रता अधिक आहे. पूरग्रस्त भागात बचावकार्य सुरळीत पार पाडण्यासाठी नौदल आणि आपत्कालीन सेवांचे पथक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवत आहेत. पोलिसांनीही हेलिकॉप्टरच्या मदतीने अडकलेल्या लोकांना बाहेर काढले आहे. या भीषण आपत्तीत 'व्हॅलेन्सिया'तील एक मोठा पूल कोसळल्याने वाहतुकीचा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे, त्यामुळे लाखो नागरिकांना अंधारात राहावे लागत आहे.

सरकारकडून तातडीची मदत आणि काळजी

स्पेन सरकारने पुरग्रस्तांना अन्नधान्य, निवारा आणि तातडीची वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी विशेष उपाययोजना केली आहे. पंतप्रधान सांचेझ यांनी नागरिकांना पुढील काही दिवसांत अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे, कारण हवामान खात्याच्या अंदाजानुसार काही भागांत अजूनही मुसळधार पावसाची शक्यता आहे. शाळा, सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठा बंद ठेवण्यात आली आहेत.

हवामान बदलाचे वाढते परिणाम

तज्ञांच्या मते, थंड आणि उष्ण वाऱ्यांच्या संयोगामुळे दाट ढग तयार होऊन मुसळधार पावसाला कारणीभूत ठरले आहे. स्पेनमध्ये काही वर्षांपासून दुष्काळ, विक्रमी तापमान आणि आता अतिवृष्टी अशा विविध हवामान बदलाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

पूराच्या विध्वंसक तडाख्याचा फटका लाखो नागरिकांना

पुरामुळे शाळा, बाजारपेठा, संग्रहालये, सार्वजनिक ग्रंथालये, आणि अन्य सार्वजनिक ठिकाणे बंद ठेवण्यात आली आहेत. देशातील प्रमुख शहरांमध्ये वाहतुकीचा मोठा फटका बसला आहे; माद्रिद आणि बार्सिलोना दरम्यानची रेल्वे सेवा रद्द करण्यात आली आहे. या पुरात व्हॅलेन्सियामधील एक प्रमुख पूल कोसळल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. त्याचबरोबर, सीएनएनच्या अहवालानुसार, अनेक नागरिक तळघर आणि खालच्या मजल्यांवर अडकलेले असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

या अतिवृष्टीने व्हॅलेन्सियासह मद्रिद आणि बार्सिलोना शहरांमध्ये रेल्वे सेवा बंद ठेवावी लागली आहे. पुरामुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या भागात शोधकार्य अजूनही सुरू असून मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.पंतप्रधान सांचेझ यांनी स्पेनमधील सर्व नागरिकांना या कठीण प्रसंगात एकजूट दाखवण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाने सांगितले की, पूर ओसरल्यानंतर या क्षेत्रात पुनर्बांधणीचे काम तातडीने हाती घेतले जाईल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने