पुण्यात माजी सैनिकाकडून गोळीबार तर दुसरीकडे चोरीच्या घटनांमुळे खळबळ; गुन्हेगारी वाढली

पुणे – दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात गुन्हेगारीने डोके वर काढल्याची घटना समोर आली आहे. नुकत्याच दोन दिवसांतील घटना पाहता शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. एका बाजूला पार्किंगच्या वादातून गोळीबार तर दुसऱ्या बाजूला दुकानांवर चोरीच्या घटना यामुळे शहरवासीयांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे.

येरवड्यात पार्किंग वादात गोळीबार, एका तरुणाचा मृत्यू

गुरुवारी रात्री येरवड्यातील अशोकनगर परिसरात दुचाकी पार्किंगवरून झालेल्या वादात निवृत्त लष्कर कर्मचारी श्रीकांत पाटील यांनी शाहानवाज मुलाणी (३८) यांच्यावर गोळीबार केला. गोळीबारात मुलाणी गंभीर जखमी झाले आणि त्यांना ससून रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. येरवडा पोलिसांनी आरोपी श्रीकांत पाटील यांना ताब्यात घेतलं असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पार्किंगवरील वाद विकोपाला

पार्किंगच्या मुद्द्यावरून वाढणाऱ्या वादामुळे गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. सोसायट्यांमध्ये पार्किंगच्या नियोजनाचा अभाव, सोसायटी व्यवस्थापन आणि सुरक्षारक्षकांची निष्काळजी यामुळे सदनिकाधारकांमध्ये वाद विकोपाला जात आहेत. येरवड्यातील घटनेत माजी सैनिकाने या मुद्द्यावरून एका तरुणावर गोळीबार केला, ज्यात एकजण जखमी झाला.

अलंकार पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंडा भुर्जी विक्रेत्यावर हल्ला

यापूर्वीच अलंकार पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अंडा भुर्जी विक्रेत्यावर तिघांनी गोळीबार केल्याची घटना घडली. जुन्या वादातून हा गोळीबार झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. अंडा भुर्जी विक्रेता सुदैवाने बचावला असून, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला आहे. शहरातील नागरिकांमध्ये या घटनांमुळे संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.

वडगाव ते वारजे ब्रिज – हातात बंदूक घेऊन तरुणाचा थरार

याशिवाय पुण्यातील वडगाव ते वारजे ब्रिजपर्यंत एका तरुणाने हातात बंदूक घेऊन नागरिकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे पोलिसांनी तरुणाचा शोध सुरू केला आहे. दिवाळीसारख्या सणात असं वातावरण निर्माण झाल्यामुळे लोकांमध्ये भीती पसरली आहे.

एफसी रोडवर चोरट्यांचा धुमाकूळ, १.२५ लाख रुपयांची चोरी

पुण्यातील एफसी रोड आणि जे.एम. रोडवरील दुकानांमध्ये दिवाळीच्या सणाच्या काळात चोरट्यांनी हात साफ केला. कपडे, आईस्क्रीम, शूज दुकानांवर हल्ला करून चोरट्यांनी १.२५ लाख रुपयांची चोरी केली. डेक्कन पोलीस आणि गुन्हे शाखेचं पथक घटनास्थळी पोहोचून तपास करत आहे. दोन अट्टल चोरट्यांचा संशय पोलिसांना असून, या प्रकरणातील तपास अधिक गतिमान करण्यात आला आहे.

दिवाळीत नागरिकांची सुरक्षा हीच महत्त्वाची

या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात दिवाळीचा उत्साह कमी होत असल्याचे नागरिकांमध्ये दिसून येत आहे. पार्किंग वाद, चोरी, गोळीबार अशा घटनांनी नागरिकांना सुरक्षिततेची चिंता सतावत आहे. पोलीस प्रशासनाने या घटनांचा तातडीने तपास सुरू केला असून, शहरात सुरक्षा व्यवस्था अधिक कठोर करण्यात आली आहे.ही सारी प्रकरणं पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने