ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना ब्रेन स्ट्रोक: प्रकृती गंभीर,नाशिकमध्ये उपचार सुरू

महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि माजी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांना ब्रेन स्ट्रोक आल्याने त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला आहे. आज पहाटेच्या सुमारास त्यांना अकोले, अहमदनगर येथील त्यांच्या राहत्या घरी ब्रेन स्ट्रोकचा झटका बसला. तत्काळ नाशिकच्या 9 पल्स रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, अर्धांगवायूची शक्यता वर्तवली जात आहे.

मधुकर पिचड हे ८३ वर्षांचे असून त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्यावर एन्जोप्लास्टी शस्त्रक्रिया झाली आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असली तरी ते अत्यवस्थ आहेत. त्यांचे पुत्र वैभव पिचड आणि इतर कुटुंबीय त्यांच्या सोबत रुग्णालयात आहेत.

राजकीय पुनरागमनाची शक्यता

मधुकर पिचड यांच्याविषयी सध्या राजकीय वर्तुळात देखील चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आणि त्यांच्या मुलाने, वैभव पिचड यांनी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओक येथे भेट घेतली होती. २०१९ मध्ये पिचड कुटुंबीयांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता, मात्र आता पुन्हा शरद पवार यांच्या गटात परतण्याच्या चर्चांना बळ मिळाले आहे.

महायुतीतील अकोले विधानसभा मतदारसंघ अजित पवार यांच्या गटाला सुटू शकतो, असे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर पिचड कुटुंबीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत वैभव पिचड यांचा किरण लहामटे यांनी पराभव केला होता, परंतु आगामी निवडणुकीत त्यांना पुन्हा तिकीट मिळण्याची शक्यता आहे.

मधुकर पिचड यांची राजकीय कारकीर्द

मधुकर पिचड यांनी १९८० ते २००४ या कालावधीत अकोले विधानसभा मतदारसंघातून सात वेळा आमदार म्हणून निवडून येऊन आपली ताकद सिद्ध केली. त्यांनी १९९५ ते १९९९ या काळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून देखील काम पाहिले आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी आदिवासी विकास, दुग्धविकास, प्रवास विकास, पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालये सांभाळली आहेत.

राजकीय अनुभवासह, त्यांनी १९९३ मध्ये अगस्ती सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासकामे झाली. मात्र, २०१९ मध्ये त्यांनी मुलासह भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता मात्र, त्यांच्या प्रकृतीसह राजकीय दिशादर्शनासाठी संपूर्ण राज्याचे लक्ष पिचड कुटुंबीयांवर केंद्रित झाले आहे.मधुकर पिचड यांची तब्येत लवकर सुधारावी आणि त्यांनी पुन्हा समजकार्यात उतरावे, अशीच सर्वांची अपेक्षा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने