चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथील माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट उच्च माध्यमिक शाळेचे व्यवस्थापन आता अदानी फाऊंडेशनकडे सोपविण्यात आले आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने २७ सप्टेंबर रोजी यासंदर्भात अधिकृत शासन निर्णय (जीआर) काढला आहे. या निर्णयामुळे अदानी समूहाने आता शिक्षण क्षेत्रात देखील आपला प्रवेश साधला आहे. माऊंट कार्मेल शाळा ही इंग्रजी माध्यमाची स्वयंअर्थसहाय्यित शाळा असून, इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण दिले जाते.
तीन महिन्यांमध्ये निर्णय मंजूर
या हस्तांतरणाची प्रक्रिया ३० जून २०२४ रोजी शिक्षण उपसंचालक, नागपूर यांच्याकडे प्रस्तावित करण्यात आली होती. तिन्ही महिन्यात या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आणि काही अटी व शर्तींच्या पालनासह शाळेचे व्यवस्थापन अदानी फाऊंडेशनकडे देण्यात आले. यामध्ये शाळेची किमान पटसंख्या कायम ठेवणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जबाबदारी अदानी समूहाची असणे, आणि शाळेची मान्यता कायम ठेवण्याच्या अटींचा समावेश आहे.
अदानी समूहाच्या जबाबदाऱ्या
शाळेतील विद्यार्थी संख्येत कोणताही बदल करण्यात येणार नाही, तसेच शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांचे वेतन आणि सेवा अटींचे पालन करण्याची जबाबदारी अदानी फाऊंडेशनवर असणार आहे. जर या अटींचे पालन करण्यात आले नाही, तर राज्य सरकारकडे व्यवस्थापन हस्तांतरण रद्द करण्याचा अधिकार असेल.
सरकारने घातलेल्या अटींचे उल्लंघन झाल्यास शाळेचे व्यवस्थापन पुन्हा शासनाच्या ताब्यात येऊ शकते.या हस्तांतरणाच्या प्रक्रियेत शासनाने अदानी फाऊंडेशनला काही अटी घालून दिल्या आहेत. मुख्य अट म्हणजे, शाळेच्या विद्यमान विद्यार्थ्यांच्या संख्येत कोणताही बदल करता येणार नाही, तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सर्व दायित्व अदानी समूहाच्या ताब्यात राहणार आहे. शासनाने घातलेल्या अटींचे काटेकोर पालन न झाल्यास हस्तांतरण रद्द करण्याचा अधिकार शासनाने स्वतःकडे राखून ठेवला आहे.
१५ दिवसांत व्यवस्थापन हस्तांतरण
राज्य सरकारच्या आदेशानुसार, पुढील १५ दिवसांत माऊंट कार्मेल शाळेचे व्यवस्थापन अदानी फाऊंडेशनकडे हस्तांतरित होणार आहे. नागपूर विभागाच्या विभागीय शिक्षण उपसंचालकांनी या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करून त्याची माहिती शासनाला कळविण्याचे आदेश दिले आहेत.
शैक्षणिक क्षेत्रात मोठा बदल
माऊंट कार्मेल शाळेचे अदानी फाऊंडेशनकडे हस्तांतरण हा शैक्षणिक क्षेत्रातील मोठा बदल ठरणार आहे. या निर्णयामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. अदानी समूहाचे उद्योग क्षेत्रातील यश आणि शिक्षण क्षेत्रात प्रवेश यामुळे येणाऱ्या काळात आणखी शाळांमध्ये अशा प्रकारच्या बदलांची शक्यता वर्तविली जात आहे.महाराष्ट्रातील शाळांच्या व्यवस्थापनात होणाऱ्या या बदलामुळे शैक्षणिक क्षेत्राला एक नवी दिशा मिळणार आहे.