मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता वितरित; 34 लाख महिलांना 521 कोटींचा लाभ

राज्य सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेंतर्गत दर महिन्याला पात्र महिलांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे १,५०० रुपये दिले जातात. राज्यभरातील लाखो महिलांनी या योजनेसाठी अर्ज दाखल केला आहे आणि आतापर्यंत लाखो महिलांना सन्मान निधी मिळालेला आहे.

राज्यातील 34 लाख महिलांना 521 कोटींचा लाभ

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील 34 लाख 74 हजार 116 भगिनींना 521 कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरित करण्यात आला आहे. उर्वरित महिलांना महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार असून, युद्धपातळीवर लाभ हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे.”

तांत्रिक अडचणींमुळे लाभ न मिळालेल्या महिलांना दिलासा

ज्या महिलांना तांत्रिक अडचणींमुळे लाभ मिळाला नव्हता, त्यांना यावेळेस तिन्ही हप्ते एकत्रित देण्यात येणार आहेत. तसेच, ज्या महिलांनी अर्ज भरताना चुका केल्या आहेत, किंवा ज्यांचे बँक खाते आधारशी लिंक नाही, त्या महिलांना लवकरात लवकर बँक खाते आधारशी लिंक करून घ्यावे लागेल. सरकार अजूनही नवीन अर्ज स्वीकारत आहे, त्यामुळे पात्र महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी संधी आहे.

कशी करावी खात्यात पैसे आल्याची खात्री?

महिला त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही, हे विविध मार्गांनी तपासू शकतात. त्यासाठी खालील उपाय करता येऊ शकतात:

1. SMS च्या माध्यमातून: बँकेकडून पैसे जमा झाल्याचे संदेश येईल.

2. नेट बँकिंग: ऑनलाइन बँकिंगचा वापर करून खाते तपासावे.

3. डेबिट कार्ड: एटीएममध्ये जाऊन खाते तपासू शकता.

4. बँकेत थेट जाऊन: खात्यात पैसे जमा झाले आहेत का याची खात्री बँकेत जाऊन करून घ्या.

महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वाची योजना

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना राज्यातील महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. गरीब व मध्यमवर्गीय महिलांना या योजनेतून मिळणारी आर्थिक मदत त्यांच्या कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात स्थैर्य आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. सरकारकडून सुरू असलेल्या अर्ज पडताळणी प्रक्रियेमुळे आणखी महिलांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. 

भाऊबीजेत सर्व महिलांना लाभ मिळणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच शिर्डीतील कार्यक्रमात स्पष्ट केले की, "राज्यातील एकाही भगिनीला दिवाळीच्या भाऊबीजेपासून वंचित ठेवले जाणार नाही." त्यामुळे या योजनेमुळे महिलांना आर्थिक पाठबळ मिळणार असून, त्यांना आर्थिक सक्षमीकरणाची संधी मिळेल.

तुमचे बँक खाते आणि आधार लिंक आहे का?

जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल, तर तुमचे बँक खाते आणि आधार लिंक करून घ्या. यामुळे तुम्हाला योजनेचा लाभ मिळेल आणि भविष्यातील तांत्रिक अडचणी टाळता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ऑक्टोबर 2024

महिलांसाठी सध्या सुरू असलेल्या अर्ज प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात येण्याची शक्यता असून,ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करता येतील.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने