आगामी विधानसभा निवडणुकांसाठी अजित पवार यांच्या उमेदवारीवर अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अजित पवार बारामतीमधून निवडणूक लढणार की नाही, यावर मोठा सस्पेन्स होता. काही चर्चा होती की, अजित पवार शिरूर मतदारसंघातून लढतील आणि त्यांच्या जागी त्यांचे सुपुत्र जय पवार बारामतीमधून निवडणूक लढवतील. मात्र, या सस्पेन्सचा अखेर आता शेवट झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आज अधिकृतपणे घोषणा केली की अजित पवार हेच बारामतीमधून उमेदवार असतील.
अजित पवारांची गाडी कार्यकर्त्यांनी रोखली
बारामतीतील कारभारी सर्कल येथे अजित पवार माळेगाव येथील एका कार्यक्रमानंतर दुसऱ्या कार्यक्रमासाठी जात असताना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी रोखली. कार्यकर्त्यांचा आग्रह होता की, अजित पवार यांनी स्वतःच आपली उमेदवारी जाहीर करावी. त्यांनी बारामतीमधूनच निवडणूक लढावी अशी मागणी जोरात होती. कार्यकर्त्यांच्या घोषणांमुळे काही वेळासाठी तणाव निर्माण झाला होता.
अजित पवारांनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला आणि "तुमच्या मनातील उमेदवार मीच असेन," असे सांगून त्यांची समजूत काढली. मात्र, कार्यकर्त्यांचा आग्रह कायम राहिला की, अजित पवारांनी लगेचच उमेदवारी जाहीर करावी. अखेरीस पोलिसांनी हस्तक्षेप करत गाडीला मार्ग मोकळा करून दिला.
प्रफुल्ल पटेलांनी केली अधिकृत घोषणा
या संपूर्ण गोंधळानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, "अजित पवार हेच बारामतीतून विधानसभा निवडणूक लढणार आहेत. पक्षाच्या पहिल्या उमेदवाराची अधिकृत घोषणा मीच करत आहे. कुठल्याही संभ्रमात राहू नका, बारामतीमधून अजित पवारच लढणार आहेत."
भविष्यातील राजकीय चित्र
बारामती हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे राजकीय केंद्र राहिले आहे. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा विजय आणि सुनेत्रा पवारांचा पराभव यामुळे या मतदारसंघावर नेहमीच लक्ष केंद्रित झाले आहे. आता, विधानसभेच्या निवडणुकीसाठी अजित पवारच उमेदवार असल्याने बारामतीत पुन्हा एकदा हायव्होल्टेज निवडणूक होण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या विरोधात महाविकास आघाडी कोणाला उभं करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
बारामतीत अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं यश मिळणार की त्यांच्यासमोर काही आव्हानं येणार, हे येणाऱ्या निवडणुकीत स्पष्ट होईल.