हरियाणा विधानसभेत भाजपची विजय हॅटट्रिक तर जम्मू काश्मीर मध्ये काँग्रेसला यश

हरियाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत, ज्यात भारतीय जनता पक्षाने (भाजप) घवघवीत विजय मिळवला आहे. एक्झिट पोलच्या सर्व अंदाजांना खोटे ठरवत भाजपाने काँग्रेसवर मात करत सत्ता पुन्हा मिळवली. हरियाणात यंदाच्या निवडणुकीत भाजपने बहुमताचा आकडा ओलांडत सलग तिसऱ्यांदा विजय प्राप्त केला आहे. भाजपने ४९ जागांवर विजय मिळवला आहे, तर काँग्रेसला केवळ ३५ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

एक्झिट पोल चुकले, काँग्रेसचे स्वप्न अधुरे

निवडणुकीपूर्वी झालेल्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला विजय मिळणार असल्याचे भाकीत करण्यात आले होते. काँग्रेसच्या भूपिंदर सिंग हुड्डा यांच्या नेतृत्वाखालील प्रचार मोहिमेला जोरदार प्रतिसाद मिळाल्याचे दिसत होते, परंतु भाजपने नायब सिंह सैनी यांच्या नेतृत्वाखाली एक नवा डाव खेळत काँग्रेसला पराभूत केले. निवडणुकीच्या ७ महिने आधी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना हटवून सैनी यांना मुख्यमंत्रीपदी नेमण्यात आले होते. या निर्णयाने भाजपच्या अँटी-इन्कम्बन्सी फॅक्टरला नियंत्रणात ठेवण्यास मदत झाली.

भाजपची ट्रिक यशस्वी

हरियाणात भाजपने जाट समाजाऐवजी ओबीसी आणि दलित मतदारांना जवळ करण्याची धोरण अवलंबले. या रणनीतीचा फायदा मिळाला आणि भाजपने काँग्रेसला मागे टाकत निर्णायक विजय मिळवला. भाजपने गुजरात आणि उत्तराखंडमध्ये यापूर्वीही मुख्यमंत्र्यांची अदलाबदल करून निवडणुकीपूर्वी चांगले परिणाम साधले होते. 

जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नेशनल कॉन्फरन्स आघाडीवर

दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नेशनल कॉन्फरन्स युतीने भाजपला मोठा धक्का दिला आहे. काँग्रेस-नेशनल कॉन्फरन्स ५२ जागांवर आघाडीवर असून भाजप फक्त २७ जागांवर पुढे आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर भाजपची ही पहिलीच निवडणूक होती, परंतु भाजपला तेथे अपेक्षित यश मिळालेले नाही.

 

भाजपला महाराष्ट्र-झारखंडमध्ये बूस्टर मिळणार ?

हरियाणातील विजयामुळे भाजपचा आत्मविश्वास उंचावला आहे आणि आगामी महाराष्ट्र व झारखंड निवडणुकांमध्येही हा विजय पक्षासाठी बूस्टर ठरणार आहे. हरियाणात भाजपने ग्रामीण भागात मोफत योजना जाहीर करून मोठा पाठिंबा मिळवला. महाराष्ट्रातही भाजपने ‘लाडकी बहीण योजना’ आणि वीजबिल माफी यासारख्या योजनांमुळे ग्रामीण जनतेचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.

विकासाच्या मुद्द्यावर हरियाणातील विजय

हरियाणातील भाजपच्या विजयाचे श्रेय विकासाच्या मुद्द्याला दिले जात आहे. शेतकरी आंदोलन आणि कुस्तीपटूंच्या आंदोलनामुळे भाजपविरोधात असलेले असंतोष कमी करण्यात भाजप यशस्वी ठरला. नायब सिंह सैनी यांनी अनेक लोककल्याणकारी योजना जाहीर करून मतदारांना आकर्षित केले. त्यामुळे हरियाणात भाजपचा विजय निश्चित झाला आहे.भाजपने हरियाणातील सत्ता कायम ठेवत राज्यात आपले वर्चस्व दाखवले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने