मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवासेनेचा दणदणीत विजय, १० पैकी १० जागा काबीज

विधानसभेच्या निवडणुकीचं वादळ सुरू होण्याआधीच महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलं आहे. सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या तयारीला सुरुवात केली असून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. जागावाटपाबाबत दोन्ही पक्षांमध्ये खलबतं चालू असून, या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवरूनही आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्याचबरोबर पुण्यात मेट्रो उद्घाटनावरून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील वादानेही जोर धरला आहे.

त्याचवेळी मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल लागला असून, शिवसेना (ठाकरे गट) युवासेनेने १० पैकी १० जागांवर विजय मिळवला आहे. या विजयामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला मोठा धक्का बसला असून, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी या विजयानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महत्त्वाचा संदेश दिला आहे. आदित्य ठाकरेंनी "इथूनच निवडणुकीच्या विजयाचा सिलसिला सुरू होतो," असं सूचक विधान करत शिवसेनेच्या पुढील योजनेचा इशारा दिला आहे.

या निवडणुकीत युवासेनेचा विजय त्यांच्या मागील कामगिरीची पुनरावृत्ती असून, सुशिक्षित मतदारांनी युवासेनेवर दाखवलेला विश्वास अधोरेखित करतो. संजय राऊत यांनीही निवडणुकीबाबत बोलताना मतदारांच्या निर्णयाचे कौतुक केले आणि कोर्टाच्या हस्तक्षेपामुळे निवडणुकीला योग्य रितीने पार पाडावे लागल्याचे स्पष्ट केले.

युवासेनेच्या या घवघवीत विजयाबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटलं, “शिक्षित मतदारांनी शिवसेनेवर विश्वास दाखवला आहे. या निवडणुकीत कोणतीही गडबड होऊ शकली नाही, कारण मतं बॅलेटवर झाली आहेत.” त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युवासेनेच्या यशाचं कौतुक करत, “आमचं वर्चस्व फक्त टिकवून नाही ठेवलं तर त्यात सुधारणा केली आहे. इथूनच निवडणुकांच्या विजयाचा सिलसिला सुरू होतो,” असं आदित्य ठाकरे यांनीही ट्विटरवर (X) आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.विजयाचा जल्लोष मातोश्रीवर साजरा केला जाणार आहे, तर शिवसेना भवनात या यशाचा आनंद मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

या सिनेट निवडणुकीत शिवसेना भवनात जल्लोष साजरा करण्यात आला असून, विजयी उमेदवारांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचे नियोजन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने