सांगली: नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा हिंदू समाजावर गंभीर टीका करत नवा वाद निर्माण केला आहे. दुर्गामाता दौड कार्यक्रमात मार्गदर्शन करताना भिडेंनी हिंदू समाजाच्या सणांवर आणि राजकीय व्यवस्थेवर जोरदार हल्लाबोल केला.
हिंदू समाजावर टीका
"मूर्ख लोकांचा समाज म्हणजे हिंदू समाज," असे वादग्रस्त विधान भिडेंनी केलं. गणपती उत्सव आणि नवरात्र उत्सव यांचे स्वरूप आता फक्त करमणुकीचे इव्हेंट झाले आहेत, असे त्यांनी म्हटले. नवरात्र उत्सवातील दांडियावर टीका करत भिडे म्हणाले, "दांडिया खेळणाऱ्या हिंदूंना गां** बनवले जात आहे." त्यांच्या मते, सणांची पवित्रता हरवली आहे आणि सध्या होणारे सण-उत्सव समाजाचा नाश करत आहेत.
राजकारण, सत्ताकारण आणि अर्थकारणावर सडकून टीका
संभाजी भिडेंनी सध्याच्या राजकारणावरही कठोर शब्दांत टीका केली. "राजकारण, सत्ताकारण आणि अर्थकारण हे शूद्र आहेत. ते थुंकण्याच्या लायकीचे विषय आहेत," असे त्यांनी ठणकावले. त्यांच्या मते, देशाच्या राजकीय आणि आर्थिक व्यवस्थेमुळे हिंदू समाजाला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.
महिलांच्या सहभागावर मत
दुर्गामाता दौडीत महिलांना सहभागी होण्यास विरोध दर्शवत भिडे म्हणाले, "काही माता-भगिनींना या दौडीत सहभागी व्हायचं असेल, तर त्यांनी स्वतंत्र दौड काढावी. या दौडीत महिलांना प्रवेश देणार नाही." नवरात्र उत्सवातील सध्याच्या करमणुकीच्या कार्यक्रमांवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि सांगितले की, "नवरात्राचा बट्ट्याबोळ होऊ देणार नाही."
विरोधकांचा आक्षेप
संभाजी भिडेंच्या विधानानंतर विरोधकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी हिंदूंचा अपमान करणाऱ्या विधानांवर कारवाईची मागणी केली आहे. "संभाजी भिडे यांच्यावर काय कारवाई करणार?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी भिडेंच्या विधानांचा तीव्र निषेध करत, "भिडेसारख्या लोकांना गांभीर्यानं घेण्याची गरज नाही," असे म्हटले.
संभाजी भिडे यांची वक्तव्ये नेहमीच वाद निर्माण करणारी ठरतात. यावेळीही त्यांच्या विधानांमुळे मोठा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.