रतन टाटा ICU मध्ये दाखल,प्रकृती स्थिर असल्याचे सोशल मीडियावर आश्वासन

मुंबई: टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि भारतातील प्रतिष्ठित उद्योगपती रतन टाटा यांना सोमवारी पहाटे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ८६ वर्षीय रतन टाटा यांना रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक तपासणीनंतर त्यांना अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शारुख अस्पी गोलवाला यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

रविवार मध्यरात्री १२.३० ते १ वाजण्याच्या सुमारास रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्यामुळे रतन टाटा यांना रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे, आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.

सोशल मीडियावर रतन टाटांचे आश्वासन

रतन टाटा यांना रुग्णालयात दाखल केल्याची बातमी समजताच अनेक अफवा पसरू लागल्या होत्या. मात्र, रतन टाटा यांनी स्वतः आपल्या एक्स अकाउंटवर पोस्ट शेअर करत आपल्या तब्येतीबद्दल चाहत्यांना आश्वस्त केले. त्यांनी सांगितले की, "माझ्या आरोग्याबाबत पसरत असलेल्या अफवांची मला जाणीव आहे. परंतु, काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. काही तपासण्या चालू असून, माझी प्रकृती स्थिर आहे." त्यांनी माध्यमांना विनंती केली की, चुकीची माहिती पसरवण्यापासून दूर राहावे.

 

रतन टाटा यांचा भारतातील प्रभाव

रतन टाटा यांना त्यांच्या नेतृत्वामुळे देशातील सर्वाधिक आदरनीय व्यक्तिमत्त्वांमध्ये स्थान आहे. त्यांनी १९९० ते २०१२ पर्यंत टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणून कार्य केले, ज्यात त्यांनी जग्वार लँड रोव्हरचे अधिग्रहण, टाटा समूहाचा आंतरराष्ट्रीय विस्तार आणि विविध उद्योगांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले. त्यांच्या या दीर्घकालीन योगदानामुळे त्यांना भारताचे सर्वोच्च नागरी सन्मान, पद्मभूषण (२०००) आणि पद्मविभूषण (२००८) प्राप्त झाले आहेत.

आजच्या घडीला, रतन टाटा हे केवळ उद्योगजगताचे महानायक नाहीत तर त्यांच्या परोपकारामुळे देशभरातील पिढ्यांना प्रेरणा देणारे एक आदर्श आहेत. त्यांच्या प्रकृतीविषयीची चिंता असली तरी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे त्यांच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.

संपूर्ण देशाचे लक्ष आता त्यांच्या आरोग्यावरील अपडेट्सकडे लागले आहे, आणि त्यांच्या प्रकृतीबद्दलची अधिकृत माहिती येण्याची प्रतीक्षा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने