Nagpur: नागपूर रेल्वे स्थानकावर मनोरुग्णाचा थरार: दोन ठार, दोन जखमी

नागपूर रेल्वे स्थानकावर एका मनोरुग्णाने केलेल्या हल्ल्यामुळे भीषण थरार घडला आहे. फलाट क्रमांक ७ वर सोमवारी पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. आरोपी जयराम केवट (वय ३५), हा मनोरुग्ण असल्याचं पोलिसांनी सांगितलं असून, या हल्ल्यात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी आहेत.

कशी घडली घटना ?

फलाट क्रमांक ७ वर प्रवासी आपल्या गाडीची वाट पाहत उभे होते. अचानक एक मनोरुग्ण लाकडी राफटर हातात घेऊन तिथे उभ्या असलेल्या लोकांवर हल्ला करू लागला. हा राफटर रेल्वे रुळांच्या कामासाठी वापरात येतो. त्याने लोकांच्या डोक्यावर जोरात वार केले, ज्यामुळे घटनास्थळीच दोन जणांचा मृत्यू झाला. दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, ते मृत्यूशी झुंज देत आहेत.

मृत्यूमुखी पडलेले प्रवासी

या हल्ल्यात तामिळनाडूतील दिंडीगुल येथील ५४ वर्षीय गणेश कुमार डी यांचा मृत्यू झाला आहे. ते नागपूरमध्ये काही कामानिमित्त आले होते. दुसऱ्या मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिस त्यांचा तपास करत आहेत. 

हल्ला केल्यानंतर जयराम केवट हा रेल्वे रुळावरून पळू लागला. मात्र, रेल्वे स्थानकावरील सतर्क कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेमुळे स्थानकावर मोठी खळबळ उडाली होती. लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं, अनेकजण सैरावैरा पळत होते.

पोलिस तपास सुरू

पोलिसांनी जयराम केवट याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तो मनोरुग्ण असल्याची माहिती मिळत आहे, मात्र त्याने हा हल्ला का केला याचा अधिक तपास नागपूर लोहमार्ग पोलीस करत आहेत. या भीषण घटनेने नागपूर शहरात खळबळ उडाली आहे, तर स्थानकावरील प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे.नागपूरसारख्या मोठ्या रेल्वे स्थानकावर घडलेल्या या प्रकाराने सुरक्षेच्या प्रश्नांवरही विचारमंथन होऊ लागले आहे. अशा घटना टाळण्यासाठी अधिक सुरक्षाव्यवस्था लागणार असल्याचं रेल्वे प्रशासनाने म्हटलं आहे.

या हल्ल्यामुळे स्थानकावर आणि शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे स्थानकावरील प्रवासी भयभीत झाले असून, रेल्वे सुरक्षा यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह उभे झाले आहेत. रेल्वे पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून, या हिंसक हल्ल्यामागचं नेमकं कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.नागपूरच्या रेल्वे स्थानकावर घडलेली ही दुर्दैवी घटना लोकांच्या मनात भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण करणारी ठरली आहे. पोलिस आणि प्रशासनाने आता सुरक्षा व्यवस्थेवर अधिक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने