मनोज जरांगे पाटील निवडणूक लढवणार! विधानसभेच्या आखाड्यात तीन महत्त्वाच्या घोषणांसह प्रवेश

मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा केली आहे. अंतरवाली-सराटीतील एका मोठ्या सभेत त्यांनी विधानसभेत उतरून थेट निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय जाहीर केला. या घोषणेने मराठवाड्यातील राजकीय वातावरण तापले असून, मराठा समाजातील मतदारसंघांमध्ये मोठी हालचाल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणात तीन महत्त्वाचे मुद्दे मांडले:

1. जिथे मराठा उमेदवार निवडून येण्याची खात्री आहे, तिथेच उमेदवार उभा करणार.
2. एससी-एसटीसाठी राखीव जागांवर उमेदवार देणार नाहीत, तर तिथे आपल्या विचारांचा उमेदवार असलेल्या पक्षाला पाठिंबा देणार.
3. जिथे उमेदवार उभा करणार नाही, तिथे जो ५०० रुपयांच्या बाँडवर त्यांच्या मागण्या मान्य करण्याचं लिखाण देईल, त्याला समर्थन आणि मत देणार, अन्यथा त्याला विरोध करणार.

जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलं की, एका जातीच्या आधारावर निवडणूक जिंकणे शक्य नाही. समीकरणांचा विचार करुनच उमेदवार निवडावे लागतील. त्यांनी यावेळी इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्याचे आवाहन केले आणि शेवटच्या दिवशी कोणाचे अर्ज मागे घ्यायचे हे ठरवणार असल्याचे सांगितले.

मराठा आंदोलकांची निवडणुकीत थेट भागीदारी हे एक मोठं पाऊल आहे. जवळपास ८०० जणांनी अर्ज दाखल केले आहेत, आणि या उमेदवारांमध्ये मराठवाड्यातील अनेक महत्त्वाचे मतदारसंघ येणार असल्याची शक्यता आहे. मात्र, एससी-एसटीसाठी राखीव असलेल्या जागांवर उमेदवार उभे न करण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय महत्त्वपूर्ण ठरला आहे.

जरांगे यांनी राजकीय भूमिका घेण्याचा विचार नसल्याचे सांगितले, परंतु मराठा समाजाच्या न्यायासाठी आणि त्यांचं आरक्षण मिळवण्यासाठी आपण हे पाऊल उचलत असल्याचं स्पष्ट केलं. "आपण राजकारणाच्या नादात आंदोलनापासून दूर नाही गेलो पाहिजे," असा सल्ला त्यांनी मराठा समाजाला दिला आहे.

मराठवाड्यात जरांगे फॅक्टरचं वजन

लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर महायुतीसाठी मराठवाड्यात महागात पडला होता, आणि आता विधानसभेला जरांगे यांच्या थेट सहभागामुळे राजकीय चित्रात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही मतदारसंघांमध्ये मराठा समाजाच्या १ लाखापेक्षा अधिक मतदार आहेत, त्यामुळे जरांगे यांची रणनीती महत्त्वपूर्ण ठरेल.

जरांगे पाटील यांनी सांगितले की, जिथे आपण जिंकू शकणार नाही, तिथे दुसऱ्यांना संधी देणार, परंतु मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन घेऊनच उमेदवारांची निवड होणार आहे. त्यामुळे निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या दिवशी कोणकोणते अर्ज मागे घेतले जातात आणि कोणाला पाठिंबा दिला जातो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

राजकीय समीकरणात जरांगे फॅक्टरचा प्रभाव

जरांगे यांनी सांगितलं की, महाविकास आघाडी आणि महायुती हे राजकीय पक्ष एकमेकांचे सख्खे मावस भाऊ आहेत, तर आपण सावत्र भाऊ. त्यामुळे आपल्यामुळे दोन्ही पक्षांना वेगळा मार्ग काढावा लागणार आहे. मराठा समाजासाठी त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली असून, त्यांची आगामी निवडणुकीतली भूमिका मराठवाड्यातील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता निर्माण करत आहे.

मनोज जरांगे पाटील यांचा विधानसभा निवडणुकीतील सहभाग मराठा समाजाच्या लढाईत एक मोठं पाऊल ठरू शकतं. त्यांच्या निर्णयामुळे मराठवाड्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे आणि मराठा मतदारांवर या निवडणुकीत मोठं लक्ष केंद्रीत होण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने