Mumbai: सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादात उंदराची पिल्ले? व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ

मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादावर सध्या गंभीर आरोप केले जात असून, एका व्हायरल व्हिडिओमुळे मंदिर प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या व्हिडिओमध्ये मंदिराच्या प्रसादाच्या ट्रेमध्ये उंदरांचे पिल्ले असल्याचे दिसत असून, यामुळे भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निर्माण झालेली खळबळ

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये प्रसादाच्या पॅकेट्समध्ये उंदीर असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. यामुळे प्रसादाच्या स्वच्छतेबाबत गंभीर शंका उपस्थित करण्यात येत आहेत. काही भाविकांनी प्रसादाची पाकिटं कुरतडलेली दिसल्याचेही म्हटले आहे. यामुळे सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादाच्या गुणवत्तेवर आणि स्वच्छतेवर प्रश्न उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे.

मंदिर प्रशासनाचे स्पष्टीकरण

सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने या आरोपांना फेटाळले आहे. ट्रस्टच्या सचिव वीणा पाटील यांनी सांगितले की, हा व्हिडिओ मंदिराचा नसून, त्यामागील सत्यता अद्याप स्पष्ट झालेली नाही. "व्हिडिओमधील प्रसंगाचा आणि सिद्धिविनायक मंदिराचा काहीही संबंध नाही. या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जाईल," असे त्यांनी स्पष्ट केले.

ट्रस्ट अध्यक्षांनी आरोप फेटाळले 

मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी देखील या आरोपांना स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. त्यांनी सांगितले की, हा व्हिडिओ फेक आहे आणि मंदिराला बदनाम करण्याच्या उद्देशाने बनवला गेला आहे. “मंदिर परिसरात नेहमीच स्वच्छता राखली जाते आणि अशा प्रकारची घटना घडण्याची शक्यता नाही. कोणी तरी प्लॅस्टिकमध्ये काहीतरी ठेवून हा व्हिडिओ बनवला असावा,” असे सरवणकर यांनी सांगितले.

तपास सुरू

मंदिर प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, लवकरच सत्य समोर येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. तिरुपती बालाजी मंदिरातील लाडवांमध्ये प्राण्यांच्या चरबीचे अंश सापडल्याच्या आरोपानंतर आता सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादावरही शंका उपस्थित झाल्याने भाविकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

दरम्यान, सिद्धिविनायक मंदिरातील महाप्रसाद हा भाविकांसाठी अत्यंत श्रद्धेचा विषय आहे. दररोज येथे हजारो लाडू तयार केले जातात आणि भाविकांना वितरित केले जातात. अन्न व औषध विभागाच्या मान्यतेनुसार या लाडूंमध्ये वापरण्यात येणारे घटक प्रमाणित असतात आणि स्वच्छतेच्या सर्व उपाययोजना राबविल्या जातात. तरीही, या व्हिडिओनंतर महाप्रसादाच्या गुणवत्तेवर आणि स्वच्छतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सध्या व्हायरल व्हिडिओमागील सत्यता अद्याप समोर आलेली नाही. प्रशासनाने यावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. भाविकांसाठी प्रसाद हा श्रद्धेचा विषय असल्याने, सत्य समोर आल्यानंतरच या वादाला पूर्णविराम मिळेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने