इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात सोमवारी (२३ सप्टेंबर) घडलेला संघर्ष गेल्या काही वर्षांतील सर्वांत घातक ठरला आहे. इस्रायली हवाई हल्ल्यांत ४९२ नागरिकांचा मृत्यू झाला असून १६०० हिजबुल्लाह तळ लक्ष्य करण्यात आले आहेत. हिजबुल्लाहनेही प्रत्युत्तरादाखल इस्रायलवर २०० हून अधिक रॉकेट डागले, मात्र इस्रायलच्या रॉकेट संरक्षण प्रणालीमुळे त्याचा फारसा परिणाम झाला नाही.
Image Source:www.axios.com |
२००६ नंतरचं सर्वांत मोठं क्रॉस-बॉर्डर ऑपरेशन
२००६ च्या इस्रायल-हिजबुल्ला युद्धानंतर लेबनॉनवरचा हा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे. या हल्ल्यांमुळे लेबनॉनमधील हजारो नागरिक राजधानी बैरुतकडे स्थलांतर करत आहेत. इस्रायलने हिजबुल्लाच्या तळांवर लक्ष केंद्रित केलं असून अनेक नागरिकही या हल्ल्यांचा बळी ठरले आहेत. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, एअर स्ट्राईकमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यात लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय प्रतिसाद आणि सुरक्षा
हिजबुल्लाने या हल्ल्याला उत्तर देत उत्तर इस्रायलच्या दिशेने रॉकेट डागले, परंतु इस्रायली संरक्षण प्रणालीमुळे त्याचा फारसा परिणाम झाला नाही. हिजबुल्लाने इस्रायलच्या अनेक लष्करी तळांवर हल्ले केल्याचा दावा केला आहे. अमेरिकेनेही या घटनेची दखल घेतली असून संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Image Source :www.timesofisrael.com |
इराण आणि तुर्कीचा इशारा
इराणने या संघर्षात अमेरिकेचा हस्तक्षेप झाल्याचा आरोप केला आहे, तर तुर्कीने मध्यपूर्वेतील आणखी देशांना या युद्धात खेचलं जाण्याची भीती व्यक्त केली आहे. इजिप्तने या परिस्थितीत बैरुतला जाणारी आणि येणारी विमान सेवा रद्द केली आहे.
भारताची भूमिका आणि शांतता प्रयत्न
इस्रायल-हिजबुल्ला संघर्षात शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात भारताचंही योगदान आहे. ब्लू लाइन नावाच्या १२० किलोमीटर लांबीच्या सीमेवर शांतता राखण्यासाठी भारतीय जवानांची तैनाती करण्यात आली आहे. ही तैनाती युनायटेड नेशन्सच्या इंटरिम फोर्सच्या अंतर्गत आहे. भारताकडून या युद्धावर लक्ष ठेवण्यात येत असून, शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्ट केलं आहे की, इस्रायल युद्धाची घोषणा करू इच्छित नाही, परंतु आपल्या नागरिकांचं रक्षण करण्यासाठी कोणतीही जोखीम घेतली जाईल. हिजबुल्लाच्या हल्ल्यांनंतर इस्रायलने दक्षिण लेबनॉनमध्ये जमिनीवर हल्ले करण्याचं सूतोवाच केलं आहे. अमेरिकेनेही पश्चिम आशियात आपल्या सैन्याची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे या संघर्षाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.
हिजबुल्लाह काय आहे ?
हिजबुल्लाह ही एक शिया मुस्लिम संघटना असून, लेबनीज गृहयुद्धाच्या काळात तिची स्थापना झाली. इराणकडून हिजबुल्लाला आर्थिक आणि लष्करी सहाय्य मिळतं, ज्यामुळे ती संघटना अधिक सशक्त झाली आहे. हिजबुल्लाची स्वतःची पॅरामिलिटरी आर्मी असून, ती इस्रायलविरुद्ध सातत्याने हल्ले करत आहे. अमेरिकेने हिजबुल्लाला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे, परंतु हिजबुल्ला लेबनीज राजकारणातही सक्रीय आहे.
सध्याचा इस्रायल-हिजबुल्लाह संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मध्यपूर्वेतील तणाव वाढत असून, अनेक देश या युद्धात ओढले जाण्याची भीती आहे. इस्रायलच्या हल्ल्यांमुळे लेबनॉनचं नुकसान होणं सुरूच आहे, तर हिजबुल्ला आपल्या तळांना वाचवण्यासाठी नागरिकांचा आश्रय घेत आहे.