नवी दिल्ली - पॅरासीटामोल, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि मधुमेहाच्या औषधांसह एकूण ५३ औषधांची गुणवत्ता तपासणी चाचणीत नापास झाली असल्याचा धक्कादायक अहवाल भारतीय औषध नियामक संस्था सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने (CDSCO) जाहीर केला आहे. या औषधांमध्ये सामान्यपणे घराघरात वापरल्या जाणाऱ्या आणि औषधांच्या दुकानांमध्ये सहज उपलब्ध असलेल्या औषधांचा समावेश आहे.
CDSCO काय आहे?
CDSCO म्हणजे सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन. ही भारत सरकारची एक महत्त्वाची संस्था आहे जी देशातील औषधांचा दर्जा, सुरक्षा आणि परिणामकारकता यांची तपासणी व नियंत्रण करते. औषधं आणि वैद्यकीय उपकरणं बाजारात येण्यापूर्वी त्यांच्या गुणवत्तेची खात्री करून घेणे, तसेच भारतात विक्रीसाठी येणाऱ्या औषधांची मंजुरी देणे ही या संस्थेची मुख्य जबाबदारी आहे.
औषध नियामक संस्थेच्या अहवालानुसार, गुणवत्तेच्या मानकांमध्ये अपयशी ठरलेल्या औषधांमध्ये पॅरासीटामोलच्या गोळ्या, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचे सप्लिमेंट्स, मधुमेहावरील ग्लिमेपिराइड औषध, आणि उच्च रक्तदाबासाठी वापरल्या जाणाऱ्या टेलमिसार्टन औषधांचा समावेश आहे. हे औषधे विविध कंपन्यांनी तयार केले असून त्यांची तपासणी दर महिन्याला होणाऱ्या रँडम सॅम्पलिंगद्वारे केली जाते.
सामान्यपणे ताप किंवा वेदना कमी करण्यासाठी घेतली जाणारी पॅरासीटामोल गोळीदेखील या चाचणीत फेल ठरली आहे. त्यामुळे ताप किंवा अन्य लहानसहान आजारांवर घेतल्या जाणाऱ्या या औषधांचा विचारपूर्वक वापर करण्याची आवश्यकता आहे.
फेल ठरलेली औषधे:
1. पॅरासीटामोल IP 500 मिग्रॅम – सौम्य ताप व वेदना कमी करण्यासाठी वापरली जाते.
2. ग्लिमेपिराइड – मधुमेहासाठी वापरले जाणारे औषध.
3. टेलमिसार्टन 40 मिग्रॅम – उच्च रक्तदाबाच्या उपचारांसाठी.
4. पॅन्टोसिड – ऍसिडिटी आणि ऍसिड रिफ्लेक्सवर उपचार करणारे औषध.
5. शेलकल C आणि D3 – कॅल्शियम पूरक औषध.
CDSCO ने जाहीर केलेल्या अहवालात आणखी काही औषधांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काही औषधे बनावट असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे, याबाबत सखोल चौकशी सुरू आहे.भारताच्या औषध नियामक संस्थेने यापूर्वीदेखील 156 पेक्षा जास्त फिक्स्ड-डोज ड्रग कॉम्बिनेशन्सवर बंदी घातली होती. अशा औषधांच्या वापरावर सरकारच्या कडक नियंत्रणाची आवश्यकता आहे.
या गोळ्या सहज उपलब्ध असल्या तरी त्याचा अनियंत्रित वापर धोकादायक ठरू शकतो. विशेषतः ताप किंवा वेदनांवर घेतल्या जाणाऱ्या पॅरासीटामोलसारख्या औषधांचा नियमित वापर करणाऱ्यांनी सतर्क होणे आवश्यक आहे. औषधे वापरण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे हेच सुरक्षित ठरेल.
आरोग्याची काळजी घ्या
या घटनेनंतर सर्वसामान्यांनी सावध राहणे गरजेचे आहे. ताप, वेदना किंवा कोणत्याही समस्येसाठी स्वतःच्या मनाने औषधं घेणे धोकादायक ठरू शकते. जर तुम्ही ताप आला म्हणून पटकन पॅरासिटामोल किंवा इतर औषधं घेत असाल तर ती बंद करा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. औषधांच्या दर्जाबाबत सजगता ठेवूनच आपले आरोग्य जपता येईल.
संपूर्ण यादी सीडीएससीओच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. यामध्ये दर्जा चाचणीत अपयशी ठरलेल्या औषधांची माहिती दिली आहे. त्यामुळे आपण या यादीत आपल्याकडे असलेल्या औषधांची नावे आहेत का ते तपासा, आणि आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहा!