भलर - एक आदिम लोकगीताचा प्रकार,पिढ्यानपिढ्या जपलेला सांस्कृतिक वारसा

कष्टमय जीवनातील आनंदाचे प्रतीक: आदिवासी लोकगीतांची परंपरा

आदिवासी जमातींच्या सांस्कृतिक जीवनात परंपरागत लोकगीतांना आजही महत्त्व आहे. आदिवासींची लोकगीते ही स्वयंस्फूर्त असतात. ही लोकगीते कुणी लिहून ठेवलेली नाहीत. ती मोठ्यांनी गायीली आणि लहानांनी ऐकून मनात साठविली अशी मौखिक परंपरा जतन केलेली आहे आणि याच प्रकारे हु लोकगीते एका पिढीकडून दूस-या पिढीकडे संक्रमित होतात. 'भलर' हा देखील लोकगीताचाच एक भाग आहे.

आदिम महादेव कोळी जमातीचे पारंपारिक वाद्य 'ढोल '

जंगल, द-याखो-यांतील जीवनात आदिवासी बांधवाना करमणूक व मनोरंजनाचे कुठलेच साधन उपलब्ध नसल्यामुळे ते गाणी, नृत्य आणि वाद्यकाम यातून आपला आनंद व्यक्त करीत असतात. आदिवासी समाज आर्थिकदृष्ट्या मागासलेला असला तरी सांस्कृतिकदृष्या मागासलेला नक्कीच नाही. याची जाणीव त्यांच्या कल्पकतेतून दिसून येते. पावसाळ्यात शेतीतील लावणी असो, खुरपणी असो, निंदणी असो वा गवत कापणी असोत. ही सर्व कामे सांघिक पद्धतीने केली जातात. गावातील चार-पाच घरांतील माणसं मिळून एक गट तयार केला जातो. त्याला 'पडकय' असे म्हणतात. गटात जेवढे सदस्य असतात त्या प्रत्येकाच्या शेतातील कामे सर्वजण मिळून आळीपाळीने करतात. शेतातील ही जवळजवळ सर्वच कामे ओणव्याने अथवा अर्धे बसून करण्याची असल्यामुळे ती कष्टप्रद व पाठदूखी जाणविण्याजोगी असतात. अशावेळी कामाचा वेगही मंदावतो.

गाडेवाडी,ता. आंबेगाव,जि. पुणे येथील भिमा जढर बाबा ढोल वाजवताना 

आपल्या बोलण्यात नेहमी येते की...' बोलता-बोलता वेळ कसा निघून गेला ते कळलेच नाही.' याच प्रकारे शेतातील सामूहिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या अंगमेहनतीच्या कामात थकवा जाणवू नये म्हणून 'भलर' या लोकगीत प्रकाराचा उगम झाला. भलर म्हणजे स्वयंस्फूर्त, स्वरचित लयबद्ध केलेले गीत. या गीताला अशी चाल असते की, काम करण्यास हुरूप येतो. या स्वरचित गीतात घर, शेत, बैलजोडी, देव, निसर्ग अशा गोष्टींचे वर्णन केलेले असते. या गीतांची यमकजुळणीही अगदी योग्यप्रकारे केलेली असते.

         

           

' काम करून अंग माझं भिजलं घामानी,

             सम्दी पिकं डोलू लागाली जोमानी'


                              किंवा 


                     'खाऊनी काताचं पान

                      तोंड झालयं रंगूच लाल

                      मुंबईला जीवाचं हाल

                      रंगू देसावर चाल...'


या प्रकारची अगदी चपखल शब्दरचना केलेली असते. साधारणपणे १० ते १५ जणांच्या टोळीत ३-४ वयस्कर मंडळी भलर गायचे काम करतात. त्यातीलच एकजण ढोल वाजवतो, दोघेजण टाळ वाजवितात व एकजण टिप-या वाजवित भलरची गाणी म्हणत असतात. ते काम करणाऱ्या पडकयच्या पुढे चालत असतात. मागे काम करणारी माणसं काम करतानाच भलरची झील ओढत असतात. गाणी बोलत असताना त्यांना कामाचा थकवा जाणवत नाही आणि कामंही पटकन होतात. काहीक्षणासाठी तरी प्रत्येकजण आपले खडतर जीवन, कष्ट, तहानभूक विसरून भलरच्या माध्यमातून आपला आनंद व्यक्त करत असतो. समूहगान हा प्रकार यातूनच उगम पावला आहे.

भात शेतात काम करताना व भलरीची गाणी म्हणत,ढोल वाजवताना महादेव कोळी जमातीचे पुरुष व महिला 

बदलणाऱ्या काळाच्या ओघात 'भलर लोकगीत पद्धती' केवळ नावालाच शिल्लक राहीली आहे. तरीसुद्धा भिमाशंकर भागातील आसाणे गाव आणि परिसरातील आदिवासी 'कोळी महादेव' बांधव ही संस्कृती आजही जपून आहेत. लोकगीते हा देखील आदिवासी संस्कृतीचाच एक भाग असल्यामुळे लोकगीतांचेही संवर्धन होणे गरजेचे आहे. कारण...


     " भलर ही आदिवासी लोकगीतांची झालर आहे."


              लेखक- संतोष द. मुठे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने