Delhi:अरविंद केजरीवाल यांची अखेर तुरुंगातून सुटका,सर्वोच्च न्यायालयाने केला जामीन मंजूर

दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला आहे. आज, १३ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील महत्त्वपूर्ण निर्णय दिला. गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगात असलेले केजरीवाल यांचा आता तुरुंगातून सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे आणि आज संध्याकाळपर्यंत त्यांची तिहार जेलमधून सुटका होण्याची शक्यता आहे.

निकाल ठेवला होता राखून 

केजरीवाल यांनी या अटकेला आव्हान देत दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या होत्या. यातील एक याचिका त्यांच्या अटकेला बेकायदेशीर घोषित करण्यासाठी, तर दुसरी जामिनासाठी होती. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने या याचिकांवर ५ सप्टेंबरला सुनावणी घेतली होती आणि निकाल राखून ठेवला होता. अखेर आज, न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला आहे.

शरद पवार यांची प्रतिक्रिया 

या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले आहे, "अरविंद केजरीवाल यांना मिळालेल्या जामीनाने लोकशाहीचा पाया भक्कम असल्याचे सिद्ध झाले आहे. सत्याच्या मार्गावर चालणाऱ्यांना नेहमीच न्याय मिळतो."

दिल्लीच्या मद्य धोरणात आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप लागल्यानंतर सीबीआयने केजरीवाल यांना २६ जून रोजी अटक केली होती. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जामीनासाठी धाव घेतली. या प्रकरणात न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्जल भुयान यांच्यात काही मुद्द्यांवर मतभेद होते, परंतु अखेर न्यायालयाने केजरीवाल यांना जामीन मंजूर केला.

सीबीआयने अरविंद केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते. या आरोपांच्या अनुषंगाने दिल्ली मद्य धोरणात दारू व्यावसायिकांना फायदे मिळवून देण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. तथापि, आम आदमी पक्ष आणि दिल्ली सरकारने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.


न्यायमूर्ती भुयान यांचे सीबीआयच्या अटकेवर गंभीर प्रश्न 

या संपूर्ण प्रकरणात न्यायमूर्ती भुयान यांनी सीबीआयच्या अटकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी स्पष्ट केले की अटक केवळ ईडी प्रकरणात मिळालेल्या जामीनानंतर केजरीवाल यांना अडचणीत आणण्यासाठी होती. न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा मिळाला आहे, आणि त्यांचा पक्ष आम आदमी पार्टी या निर्णयाने खूश आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या तुरुंगातून सुटकेनंतर दिल्लीतील राजकीय वातावरणात मोठे परिवर्तन होण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने