परतीच्या पावसाचा शेतीला तडाखा,पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात नवरात्रीचा उत्साह उधाणावर असताना अचानक आलेल्या परतीच्या पावसाने सणासुदीच्या उत्सवात अडथळा आणला आहे. गुरुवारी सायंकाळपासून मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली, ज्यामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आणि नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला. यामुळे नवरात्रीचे दांडिया व रास गरबा कार्यक्रम देखील अर्ध्यातच थांबवावे लागले. आता दसऱ्याच्या मुहूर्तावर देखील पावसाचे सावट दिसत आहे.

राज्यातील परतीच्या पावसाने काही काळ विश्रांती घेतल्यानंतर गुरुवारी पुन्हा नव्याने सुरुवात झाली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पूर्वेकडील वारे सक्रिय झाले आहेत. परिणामी राज्यातील तापमानात आणि आर्द्रतेत वाढ होत असून, परतीचा पाऊस जोर धरू लागला आहे. मुंबईसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दसरा मेळाव्यावर पावसाचे सावट 

या पावसामुळे दसरा मेळाव्यावर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राजकीयदृष्ट्या महत्व प्राप्त झाले आहे, कारण विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. दोन वेगवेगळ्या मेळावे होत असल्याने लाखो शिवसैनिक मुंबईत दाखल होण्याची अपेक्षा आहे. मात्र हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, पावसामुळे मेळावे आयोजित करण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


परतीच्या पावसामुळे शेतीचे नुकसान

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसला आहे. राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये केलेली सोयाबीन, मका, आणि कापूस पिके पाण्याखाली गेली आहेत. विशेषतः कोल्हापूर, सांगली, आणि मराठवाड्यातील भागांत पावसामुळे भात आणि द्राक्ष पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीमुळे मोठा आर्थिक फटका बसत आहे.

मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ

मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, आणि कल्याणमध्ये मुसळधार पावसामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्त्यांवर वाहनांची गर्दी झाली. लोकल सेवा देखील काही प्रमाणात प्रभावित झाली. पावसाच्या अचानक झालेल्या धडकामुळे नवरात्रीचा उत्साह कमी झाल्याचे दिसत आहे.

सावधगिरीचा इशारा

हवामान विभागाने ११ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी आणि शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावी, असा इशारा दिला आहे.पावसामुळे सणासुदीचा उत्साह ओसरला असला तरी, नागरिकांनी सुरक्षिततेची काळजी घेऊन पुढील काळात पावसाचे सामना करावा लागेल, अशीच स्थिती निर्माण झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने