Alibaug: अलिबागच्या रस्त्यावर पैशांचा पाऊस,नागरिकांना सापडले हजारो रुपये

अलिबाग तालुक्यातील गोंधळपाडा रस्त्यावर बुधवारी अनोखी घटना घडली. पाचशे रुपयांच्या नोटांचा पाऊस पडल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना दिवाळी साजरी करण्याची संधी मिळाली! काही मिनिटांतच रस्त्यावर पडलेल्या नोटा गोळा करून अनेकांनी आपल्या खिशात भरल्या, तर काही जागरूक नागरिकांनी हे पैसे पोलिसांच्या स्वाधीन केले.

घटनेचा तपशील आणि पोलिस कारवाई

दुपारी सुमारे अडीच वाजता ही घटना घडली. कर्जत येथील एक्साइज कार्यालयातील एक महिला कर्मचारी रस्त्यावरून जात असताना त्यांना अडीच हजार रुपये मिळाले. त्यांनी ही रक्कम अलिबाग पोलिस ठाण्यातील मार्शल बिटकडे सुपूर्द केली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, रस्त्यावर पाचशे रुपयांच्या नोटांची मोठी रक्कम पडलेली होती, जी पाहून अनेकांनी ती पटकन उचलून घेतली.

निवडणुकीचा धुराळा आणि पैशांचा गोंधळ

विधानसभा निवडणुका जवळ आल्याने निवडणूक आयोगाने मतदारांवर 'पैशांचा पाऊस' पडू नये, यासाठी कटाक्षाने लक्ष ठेवले आहे. मात्र रायगड जिल्ह्यात असा प्रकार समोर आल्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. रस्त्यावर पडलेले हे पैसे कुणाचे होते, याबाबत अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. एखाद्या सामान्य व्यक्तीचे दिवाळीचे बोनस पैसे होते की निवडणुकीत वापरले जाणार होते, हे अद्याप अस्पष्ट आहे.

नागरिकांनी लंपास केलेल्या पैशांचा शोध आणि पोलिसांचे आवाहन

या घटनेमुळे काही नागरिकांनी माणुसकीचे उदाहरण दाखवले. त्यांनी मिळालेली रक्कम पोलिसांना सुपूर्द केली आहे. तर अन्य अनेकांनी पैसे घेऊन पसार झाले. अलिबाग पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ज्यांना या रस्त्यावर पैसे मिळाले आहेत त्यांनी हे पैसे पोलिसांकडे सुपूर्द करावे.

सांगली आणि पालघरमधील अशाच घटना

अशा प्रकारे पैशांचा गोंधळ फक्त अलिबागमध्येच नाही, तर यापूर्वी सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील ओढ्यातून पाचशेच्या नोटा वाहून आल्याचा प्रकार समोर आला होता. पालघरमध्येही तलासरी पोलिसांनी दादरा नगर हवेलीतून आणलेली तब्बल ४.३३ कोटींची रोकड जप्त केली होती. नवी मुंबईतही काही दिवसांपूर्वी ८६ लाखांची रोकड जप्त करण्यात आली होती. राज्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशांचा वापर होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने सतर्क राहून तपासणी करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने